Tuesday, December 30, 2008

बरं झालं...

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो...
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन...
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन...
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा..."

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील...
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन...
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा...!"

माझ्या अंगाखांद्यांवर
आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील...
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील...
ती म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं...
नाहीतर सगळा रखरखाटच होता !
याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळसळवत कुजबुजीन -
"बरं झालं मी झाड झालो...
वेडा कवी होण्यापेक्षा"

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लागेलही...
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढाळतील;
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल,
आणि...

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
"बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा..."

माझ्यावरती 'कोणी मी'
जळून राख बनताना
धूर सोडत म्हणेन -
"बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मरण्यापेक्षा..."


कवी - संदीप खरे

1 comment: