Tuesday, August 19, 2008

समुद्रराग

पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा

काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती
आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती

हाक ये दूरुन एक झाकळून टाकते
गाढ गूढ आठवांत मूक वेल वाकते

माखते चराचरी अथांग गांग गारवा
आगळा जगास ये उदास रंग पारवा

धूसरे सरींत दूर, सूरसूर व्याकळे
भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे

कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते
सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते


कवी - बा. भ. बोरकर

4 comments:

  1. तुम्हाला कविता आवडतात तर माझ्या मामांच्या कवितांचा माझा ब्लॉगहि पहा. ते प्रसिद्ध कवि नाहीत व जुन्या पिढीचे आहेत पण त्यांच्या कविता तुम्हाला आवडतील.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, मला भेट द्यायला नक्कीच आवडेल. आपण जर त्यांच्या ब्लॉगची लिंक दीलीत तर मी तो नक्कीच पाहीन. आपल्या Replyची वाट पहात आहे. :)

    ReplyDelete
  3. http://mamachyakavita.blogspot.com या वेबसाइट्वर पहा. माझे इतर ब्लॉगहि माझ्या प्रोफ़ाइलवर दिसतील.

    ReplyDelete