Thursday, July 31, 2008

देणा-याने देत जावे

देणा-याने देत जावे;
घेणा-याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणा-याने देत जावे;
घेणा-याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावेत.


कवी - विंदा करंदीकर

Wednesday, July 30, 2008

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


कवी - बा. सी. मर्ढेकर

Tuesday, July 29, 2008

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


कवी - बालकवी

Monday, July 28, 2008

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलाविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!

कवी - ना. धों. महानोर

Friday, July 25, 2008

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

कवी - कुसुमाग्रज

Thursday, July 24, 2008

अजूनही तिन्ही सांज...

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते

कवयित्री - इंदिरा संत

Wednesday, July 23, 2008

सायंकाळची शोभा

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

कवी - भा. रा. तांबे

Tuesday, July 22, 2008

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!


कवी - केशवसुत

Friday, July 18, 2008

तेच ते...

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहील्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण, जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते


कवी - विंदा करंदीकर

Wednesday, July 16, 2008

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटींबे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीण
अजूनी करते दिडदा दिडदा.


कवी - बा. भ. बोरकर

Tuesday, July 15, 2008

को-या को-या कागदावर...

को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

ती मनात झुरते आहे
तुम्ही पहात राहणार
कल्पनेच्या पावसात
नुसतं नहात राहणार
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
घट्ट जवळ घेतल्याशिवाय
माणुस नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

शब्द शब्द रीते शब्द
त्यांचं काय करणार?
तळ फुटक्या माठामधे
पाणी कसं भरणार?
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आपण ओठ लावल्याखेरीज
पाणी नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

करुन करुन हिशेब धुर्त
खुप काही मिळेल
पण फुल का फुलतं
हे कसं कळेल
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
फुलपाखरु बनल्याखेरीज
फुल नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

मातीमधे बीजाला
एकचं अर्थ कळतो
कोंब फुटुन आल्यावर
हीरवा मोक्ष मीळतो
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आतुन आतुन भीजल्याखेरीज
रुजणं नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं


कवी - मंगेश पाडगावकर

Monday, July 14, 2008

इठ्ठल मंदीर

माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

टाय वाजे खनखन
मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग
चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
हेचि दान देगा देवा
आवरलं भजन

आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं
उभी क्षनभरी


कवयित्री - बहिणाबाई चौधरी

Friday, July 11, 2008

नाजूकता

नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी
नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी
भय आम्हा नाजूकतेचे हेच होते वाटले
भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले

टाकसी हळुवार अपुली नाजूक ईतुकी पाऊले
टपकती हलकेच जैसी परिजाताची फ़ुले
नाजूकता जाणून आम्ही आधीच होती बिछवली
पायातळी केव्हाच तुझिया विकल ह्रुदये आपुली

इतुका तरी हा स्पर्श ह्रुदया होईल होते वाटले
इतुके तरी सद्भाग्य उदया येईल होते वाटले
कल्पना नाजूकतेची आम्हासही नव्हती कधी
गेली आम्हा तुडवून आम्हा कळलेच ना गेली कधी

कवी - भाऊसाहेब पाटणकर.

Thursday, July 10, 2008

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कवी - कुसुमाग्रज

Wednesday, July 9, 2008

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात


कवी - कुसुमाग्रज

Tuesday, July 8, 2008

कीर्ति

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी

होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली

द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती
दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती

बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी
गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी

बोलली हे ही तुला का सांगावया लागते
मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते

होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू?

समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी
समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी?

ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी
सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी


कवी - भाऊसाहेब पाटणकर

Monday, July 7, 2008

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस



कवी - ग. दि. माडगूळकर

Friday, July 4, 2008

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका

कवी - कुसुमाग्रज

Thursday, July 3, 2008

तुझी वंचना, साधना, होत आहे

तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही आता, वेदना, होत आहे

पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे

जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे

जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे

नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे

कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे

शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे

तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे

जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे

कवी - इलाही जमादार

Wednesday, July 2, 2008

आकाशाला, भास म्हणालो...

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्र्वास म्हणालो, चुकले का हो?

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्र्वास म्हणालो, चुकले का हो?

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

चौदा वर्ष, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

घात आप्त, आघाता सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही'?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?


कवी - इलाही जमादार

Tuesday, July 1, 2008

यंदा

पाऊसपाणी देशात चांगले झाले यंदा
तलवारींचे पीक म्हणे उदंड आले यंदा

नेते विसरले मतदारांना असे कधी झाले?
नव्या आश्वासनांचे आश्वासन आले यंदा

झगडली ती अठ्ठावन्न वर्षे इच्छामरणासाठी
लोकशाहीस म्हणे मरण सुखाचे आले यंदा

औद्योगिक विकासाने गाठला म्हणे उच्चांक
काय वेठबिगार बालमजुरांचे पगार झाले यंदा?

शांत जरी कारगील, असे महापुराचा धोका
मिया मुशर्रफ नक्राश्रू बहू ढाळते झाले यंदा

सोनिया-शरद अन तिकडे भाजप-मुलायम
विळ्याचे म्हणे भोपळ्याशी सख्य झाले यंदा

फुलले स्मितहास्य तिच्या 'रक्तवर्ण' ओठांवर
देव जाणे किती आशिक हलाल झाले यंदा

पुढल्या वर्षी आणू केक, निभव भाकरीवर यंदा
वाढदिवसाला तुझ्या एवढेच घेता आले यंदा


कवी - राजेंद्र प्रधान