Monday, June 23, 2008

आजकाल मी मलाच टाळतो

आजकाल मी मलाच टाळतो
मौन आपल्यासवेच पाळतो

रोज भासशी पहाट तू नवी
रोज मी तुझ्या रुपास भाळतो

रात्र ही अशी कशी शहारते
कोण ह्या नभात चंद्र माळतो ?

ठेवलेस मोरपीस तू जिथे
मी अजून तो वळीव चाळतो

सांत्वनातही असेल फायदा
आसवे उगीच कोण ढाळतो?

पाखरे उडून दूर चालली
अंगणात पारिजात वाळतो

भेटले इथेच ते अखेरचे
हा झरा पुढे इथून वाळतो


कवी - प्रसन्न

No comments:

Post a Comment