Wednesday, February 13, 2008

आभार

घावामागुन घाव करत राहिल्याबद्दल आभार
ह्या दगडाला शिल्प बनवल्याबद्दल आभार

जागा राहीलो म्हणून मी नवी कामे करु शकलो
निद्रे आजही तू न आल्याबद्दल आभार

जुनी जखम सुकली म्हणून नव्याला जागा मिळाली
नवीचे स्वागत आणिक जुन्याबद्दल आभार

तुम्ही नसता आलात मधे, मी पाय-याच बनवल्या नसत्या
भिंतीनो, माझ्या रस्त्यात आडवे आल्याबद्दल आभार

अश्रूंप्रमाणे आईच्या कुशीत जाऊन शिरलो
मला तुझ्या नजरेतून ऊतरवल्याबद्दल आभार

आता वाटू लागलय हे सगळं जगच माझ घर
माझ्या घरात अशी आग लावल्याबद्दल आभार

दु:खात बुडाल्यावर मग आणखी बहरते कविता
असे असेल तर सर्व जगाचे त्याबद्दल आभार

आता मला चांगलीच येते मनधरणीची कला
`कुँअर' असे माझ्यावर रुसण्याबद्दल आभार


[कुँअर बेचैन यांच्या अप्रतिम गझलेचा मी जमेल तसा केलेला अनुवाद]

No comments:

Post a Comment