Friday, February 15, 2008

शून्य

परिघावर शून्याच्या
गाडा विश्वाचा फिरतो
व्यास शून्याचा घेऊन
शून्य शून्य गिरवतो

नाही आदि नाही अंत
एक क्रम एक लय
मार्ग आखीव सरळ
चाले प्रकाश वलय

शून्य काल, अवकाश
शून्य क्षितिज,आकाश
शून्य सृजन साजिरे
शून्य रोकडा विनाश

शून्यातून जन्म घेती
शून्याकृती बुडबुडे
त्यांची शून्य सुख दुःखे
आणि शून्याची झापडे

शून्य जन्मते वाढते
मांड शून्याचा मांडते
शून्यातून शून्याचाच
शून्य अर्थही काढते

शून्य कर्म शून्य भोग
शून्य शून्याचे नशीब
शून्य पुण्य शून्य पाप
सारा शून्याचा हिशोब

शून्यातून शून्य जाता
मागे शून्यच राहील
शून्य होते शून्य आहे
पुढे शून्यच राहील

मूळ अमूर्त तत्त्वाला
कोण भेदून जाईल?
शून्य शून्याचा परीघ
कसे छेदून जाईल?


कवयित्री - अदिती

No comments:

Post a Comment