Thursday, February 7, 2008

आयुष्य

आयुष्य म्हणजे असतं तरी काय
आयुष्य असतो इतिहास
तारखा वार सण
दिवस मास सण
युध्द झुंजी मरण
य़श, अपयश, स्मरण
उत्कर्ष, -हास, हास, परिहास
आयुष्य असतो इतिहास


आयुष्य असतं गणित
बेरजां पेक्षा वजाबाक्या जास्त
गुणाकारा पेक्षा भागाकार म्हणणे रास्त
आयुष्याची समीकरणं सोडवता सोडवता
संपून जातात, आयुष्याची पानं
अवघड, कठिण, जटिल
आयुष्य असतं गणित

आयुष्य असतं साहित्य
अश्रुंची फुलेच जिथे उमलतात
शोकांतिका जास्त फुलतात
कधी कधी होतो विनोद सा-याच जीवनाचा
कविता फक्त स्वप्नातच डुलतात
अन् कल्पनेतच राहून जातं लालित्य
आयुष्य असतं साहित्य

आयुष्य असतं राजकारण
ज्याचं त्याचं आपलं समीकरण
डाव पेच हार जीत
कधी पट कधी चीत
सत्ते साठी जोड तोड
पैशा साठी सारे गोड
सारंच अद्भुत असाधारण
आयुष्य असतं राजकारण

आयुष्य असते तडजोड
आयुष्य असते घडामोड
आयुष्य असते हसू
आयुष्य असते आँसू
आयुष्य असतो आरसा
आयुष्य असतो कवडसा
आयुष्य असतं रेशमी जाळं
ज्यात जखडला असतो मनुष्य
असं हे आयुष्य.

No comments:

Post a Comment