Wednesday, January 23, 2008

चंद्र, खड्डे आणि शायर

एकदा चंद्रास त्या मी
एकट्याने गाठले
वाटले जे जे मला ते
बेधडक सांगीतले

सांग मजला मिरविशी तू
एवढे टेंभे कसे?
हाय तुझिया चेहर्‍यावर
एवढे खड्डे असे!

बोलला तो चंद्र मजला
चंद्रही नव्हता कमी
'या जगी खड्डे नसावे
ही कधी नसते हमी'

'मानवा वाटेल तुजला
चेहरा माझा बरा
पुण्यनगरीतील रस्ते
पाहुनी तू ये जरा!'

ऐकुनी ते बोलणे मग
मीच माझा वरमलो
सोडुनी संवाद सारा
'पुण्य'लोकी परतलो

(आता मी काय करतो)

जावयाचे वाटते
जेंव्हा मला चंद्रावरी
सोडुनी मी काम सारे
चालतो रस्त्यावरी!

कवी -

1 comment:

  1. पुण्य नगरीतले रस्ते माझ्या ही चांगल्याच परिचयाचे आहेत अन शिरगांवकरांच म्हणणं शंभर टक्के खरं. सुंदर अन् मार्मिक कविता .
    हो माझ्या कविता तुमच्या ब्लॉग वर खुशाल प्रसिध्द
    करा (माझ्या नावानी).

    ReplyDelete