इतकी हसू नको की येतील आसवे
येईल वेळ तेव्हा नसतील आसवे
सांभाळ, चंदनाचे वय लागले तुला
नागांपरी इथेही असतील आसवे
रुजवू नकोस अंकुर हृदयात प्रीतिचा
बागेत प्रीतीच्याही पिकतील आसवे
पुसतात काजळाला दररोज जी तुझ्या
माझे कधी कुशल का पुसतील आसवे
राहो न अंतरीचे ते गूज अंतरी
हृदयातले मुखावर लिहितील आसवे
करतील सैनिकांचे स्वागत सुवासिनी
कुंकू कुणाकुणाचे पुसतील आसवे ?
ठरतात सांत्वनाला जे शब्द कोरडे
त्यांच्यात स्निग्ध माया भरतील आसवे
कित्येक 'भृंग' येती मकरंद चाखण्या
कोणी तरी कधी का टिपतील आसवे ?
कवी - मिलिंद फणसे
भावनांनी ओथंबलेली गझ़ल.
ReplyDelete